Tuesday, September 07, 2010

जपान येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी विद्यापीठाची निवड ही अत्यंत उल्लेखनीय आहे

जपान येथे आयोजित करण्यात आलेल्या माहिती संवाद कौशल्य आणि तंत्रज्ञान विषयावरील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने सोलापूर विद्यापीठाची निवड करण्यात आली असून, यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतून एका विद्यार्थ्याची निवड करण्यात येणार आहे.


जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीच्या वतीने या आंतराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारतामधील विविध विद्यापीठातील एकूण २३ विद्यार्थी शिबिरासाठी जाणार आहेत. यामध्ये केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने महाराष्ट्रातील सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव या दोन विद्यापीठांची निवड केली आहे. दि.२६ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०११ दरम्यान हे शिबीर होणार आहे. या शिबिरात जापनीज सोसायटी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अॅन्ड टेक्नॉलॉजी, बेसिक प्रोग्राम फॉर सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी, प्रमोश ऑफ इकॉनॉमिक्स इंडस्ट्रीज पॉलिसी, क्रियेशन अॅन्ड रिव्हीटालायझेशन ऑफ द इंडस्ट्रीज बाय बेसड हाय टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रीकल डेव्हलपमेंट, युज ऑफ इकॉनॉमिकल फिल्ड अॅन्ड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उद्योग आणि त्याचा विकास हा युवा पिढीला समजावा या उद्देशाने विविध देशातील युवकांसाठी हा कार्यक्रम आहे. या शिबिरात जपानमधील विद्यार्थ्यांचा सहभागही असणार आहे. शिबिरासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात येणार आहे.

शिबीरासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील पात्र विद्यार्थ्यांची नावे दि.१० सप्टेंबर २०१० पर्यंत कळवावीत, असे पत्र केंद्रीय मंत्रालयाकडून विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. त्यानुसार विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यची पाच नावे पाठविण्यात येणार आहेत. या विद्यार्थ्यांची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने तज्ज्ञ समितीकडून इंटरनेटवर ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्याची या प्रशिक्षण शिबीरासाठी निवड करण्यात येणार आहे. ही प्रक्रीया येत्या १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने उमेदवाराची तपासणी सुरु आहे. आजतागायत सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनीनी उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यामुळे राज्यपातळीवरील पुरस्कारही विद्यापीठाला मिळाला आहे. सेवा योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व कामामध्ये आणि कार्यक्रमात विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. विद्यापीठ स्थापनेपासून सुरु झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेत आजतागायत अनेक शिबीरे झाली आहेत. दिल्ली, मनाली, चेन्नई, हिवरे बाजार, राळेगणसिद्धी, कोल्हापूर, नागपूर, नांदेड आदी ठिकाणी झालेल्या शिबीरात विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. याची दखल घेत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबीरासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सोलापूर विद्यापीठाची निवड केली आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील ९ हजार १५० विद्यार्थ्यांना शासनाची मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने करण्यात आलेल्या कामाची पोच पावती असून, विद्यार्थ्याला जपान येथे जाण्याची आणि प्रशिक्षण घेण्याची मिळालेली संधी कौतुकास्पद आहे. कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांच्या मार्गदर्शनावरुन सुरु असलेल्या कामामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण होत असतो. भविष्यात याचा विद्यापीठाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. तुकाराम शिदे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment