Tuesday, October 05, 2010

राज्यातील पहिल्या ई-स्कॉलरशिप योजनेचा सोलापुरात शुभारंभ...

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यातील पहिल्या ई-स्कॉलरशिप योजनेचा शुभारंभ सोलापुरात जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.


येथील स्टेट बँक ऑफ इंडिया ट्रेझरी शाखेत कार्यान्वित करण्यात आलेल्या ई-स्कॉलरशिप सॉफ्टवेअरद्वारे शहरातील ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयातील मागास प्रवर्गातील २९३ विद्यार्थ्यांच्या स्टेट बँक ऑफ म्हैसूर शाखेत त्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन कॉलरशिपची रक्कम चालू वर्षातील ऑक्टोबर पर्यंतची रक्कम जमा करण्यात आली. या उदघाटनाप्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा प्रबंधक सुधीर भातंबरेकर, प्रबंधक पवार, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी माधव कोरवार, विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी आर. व्ही. सूर्यवंशी उपस्थित होते.

ई-स्कॉलरशिप ही योजना क्रांतीकारक असून मागासवर्गीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा थेट लाभ मिळाला असून यामुळे स्कॉलरशिप मिळण्यास विलंब होणार नाही. तसेच शिष्यवृत्ती वितरण व्यवस्थेच्या कामकाजात पारदर्शकता राहणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी यावेळी केले.

सोलापूर जिल्ह्यात ३८० महाविद्यालय असून भारत सरकार शिष्यवृत्तीधारक ५९ हजार ५६७ विद्यार्थी आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीद्वारे विविध अभ्यासक्रमानुसार दरमहा ९० ते ७४० शिष्यवृत्ती दिली जाते. प्रायोगिक तत्वावर ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २९३ विद्यार्थिनींना १ लाख २० हजार ३२० इतकी रक्कम विद्यार्थिनींच्या वैयक्तिक बँक बचत खात्यात जमा करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यातील महाविद्यालयातील शिष्यवृत्तीधारकांना ई-स्कॉलरशिपद्वारे त्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी सूर्यवंशी यांनी यावेळी बोलताना दिली.

प्रारंभी बँकेचे मुख्य प्रबंधक भातंबरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
हि बातमी वाचली खूप छान सुविधा आहे. या योजनेचा वापर सोलापुरातील सर्व महाविद्यालये करतील अशी आशा आहे.

1 comment: